सावित्रीबाई फुले म्हटल कि आपणास महात्मा ज्योतिबा फुलेयांच्या पत्नी आणि ज्यांनी महात्मा फुले यांच्या कार्यात मोलाची साथ दिली एवढ तर नक्की आठवत आणि आठवतो एक मराठीतील म्हण “ प्रत्येक कर्तुत्वान पुरुषांच्या पाठीमागे एक स्त्री असते” हे वाक्य वापरल कि काम संपल . त्या स्त्रीची ओळख तेवढ्या पुरती मर्यादित राहते. हे भयानक वास्तव आहे यातून कोणताही महान पुरुष आणि स्त्री सुटलेली नाहीत. आज क्रांतीमशाल, ज्ञानसूर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. क्रांतीमशाल, ज्ञानसूर्य हि बिरुदे ऐकल्यावर काहीतरी चुकल्यांसारख वाटत असेल क्रांतीज्योती का नाही. वास्तविक सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या भारतीय शिक्षिका, पहिल्या आधुनिक कवी, पहिल्या स्त्री-निबंधकार,पहिल्या शिक्षण तज्ञ आहेत. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेतही सावित्रीबाईह्या कृतिशील तत्वज्ञ धर्मसुधारक होत्या त्यावेळी कोणतीही स्त्रीवादाची लाट भारतात आलेली नव्हती तरीही ज्योतिबा सारख्या ज्ञानसूर्या समोरही त्यांच्या बुद्धिमतेचे तेज तिळमात्र कमी होत नाही. वास्तविक त्यांचे लिखाण काव्य  खूप Radical होती असे माझे स्वत:चे मत आहे. त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला उधवन्याचे काम सावित्रीबाई यांच्या कविता करतात.त्यामुळे त्या अंधारमय समाजाला ज्योती बनून प्रकाश देतातच पण वंचीताला परखड शब्दात लढण्यास प्रवृत्त करताना व गुलामगिरीत सुख मानणाऱ्या व निजलेल्या समाज मनात  क्रांतीची मशाल पेटवनारी मशाल आहेत. म्हणून क्रांतीमशाल, ज्ञानसूर्य सावित्रीबाई फुले असा उल्लेख करावा असे मला वाटत.

 

सावित्रीबाई फुले यांच्या बाबत आपण माहितीपटात पाहीलच आहे ते परत सांगत नाही. शिक्षणाचे काम, आणि इतर सामाजिक उपक्रमाची माहिती आपणास झाली आहे. म.ज्योतिबा फुले यांनी त्यांना अक्षर ज्ञान दिले एक शिक्षक बनवलं हे आपणास माहित आहेच. पण सावित्रीबाई यांची लेखनितील साहित्याबाबत फार कमी लोकांना माहित आहे. म.फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड , गुलामगिरी हि पुस्तके लिहिली पुढे हि पुस्तके चळवळीची विचारांचा मुला गाभा राहिली आहेत. याच काळात सावित्रीबाई फुले स्वंतत्र साहित्याची निर्मिती करताना दिसतात. १८५६ ला ‘काव्यफुले’ यात्यांच्या पहिल्या कविता संग्रहावर शंकर पार्वतीचे चित्र आहे. त्यांनी शंकरावर काव्य केलेले आहे. एका बाजूला महात्मा फुले विश्वनिर्मिती बाबत देव अथवा ईश्वर एवजी  “निर्मिक” असा शब्द वापरतात आणि सावित्रीबाई ह्या शंकरावर काव्य करतात याचा अर्थ महात्मा फुले यांच्या “निर्मिक” संकल्पनेचा दबाव त्या घेताना दिसत नाहीत म्हणूनच जोतीबा एकाच घरात अनेक धर्माचे स्वीकार करणारे गुण्यागोविंदाने नांदू शकतात असा विचार मांडताना दिसतात. याचाच अर्थ सावित्रीबाई ह्या स्वतंत्र विचाराच्या साहित्यिक होत्या. जोतिबांचे विचार त्यांच्या साहित्यात दिसून येतात आणि त्यांचे विचार जोतिबांच्या लेखनात प्रतिबिंबित होतात. हा वैचारिक द्वंद्व आणि त्यातून सावित्रीबाई फुले यांची साहित्य निर्मिती हा अभ्यासाचा विषय आहे. आपण आजच्या परीस्थित घरात काय कसले वैचारिक द्वंद्व करतो आणि काय साहित्य निर्मिती होते हे आपणास ठाऊक आहे.

वास्तविक १९ व्या शतकातील साहित्याचे विषय प्रमुख्याने परलोक, ईश्वरस्तुती, तत्वचिकीत्सा या च्या आजूबाजूलाच फिरताना दिसते. ह्याच काळात इंग्रजांच्या आगमनाने भारतातील पहिली शिक्षित पिढी ह्या आधुनिक पाश्चात्य साहित्याच्या समीप गेली आणि लिहिती झाली त्यामध्ये प्रामुख्याने कृष्णशास्त्री चिपलूनकर , लोकहितवादी, म.फुले यांचा उल्लेख करावा लागेल. यांच्या लिखाणातून पाश्चात्य जग आणि भारतीय सामाजिक परिस्थिती या मधील विरोधाभास दिसून येतो. परंतु आधुनिकतेची जाणीव आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्या काव्य रचनेतून होते आणि दिसते. इंग्रजी साहित्यातील रोमुन्तिझ्म (Romanticism) आणि तेथील र्रेश्नेलीझम (Rationalism) याचा सुरेख संगम सावित्रीबाई फुले यांच्या काव्य रचनेतून दिसून येतो.

 

सावित्रीबाईच्या ‘काव्यफुले’ या काव्य संग्रहात त्यांनी दिन शिव प्रार्थना रचल्या आहेत. शिवाला आदिनिर्मिक, अज्ञान नष्ट करणारा ज्ञानदाता असे त्या संबोधतात . वैष्णव पंथीय आणि शैव पंथीय मधील त्या शैव पंथीय विचाराकडे झुकल्या होत्या कि काय असा वाटते. त्यांनी नक्कीच विश्वनिर्मिती संदर्भात जोतीबा फुले यांच्याची वैचारिक संघर्ष केला असेल. त्या या प्रार्थनेत म्हणतात

आम्ही लेकरे तुला प्रार्थितो

विद्या देई ज्ञान इच्छितो

दैन्यासुरा संहारा  श्रीधरा ‖‖

नमन तुला शंकरा  श्रीधरा  धृ‖‖

           

 आपल्या सर्वांना माहित आहे म.फुले यांनी छ. शिवाजी महाराज यांचा पोवाडा लिहला पण आपणाला हे माहित आहे काय छ. शिवाजी महाराज यांची खालील प्रार्थना सावित्रीबाई फुले यांनी रचली आहे.

                   छत्रपती शिवाजींचे  प्रात: स्मरण करावे 

                   शुद्रादी अतिशुद्रांचा  प्रभू वंदू मनोभावे 

                   नलराजा युधिष्टिर  द्रोपदी हि जनार्धन 

                   पुण्यश्लोक पुराणात  इतिहासी शिवानन ‖‖

 

सावित्रीबाई फुले शिवाजी महाराजांचे वर्णन  करताना शुद्रादी अतिशुद्रांचा प्रभू असे करताना दिसतात तर जोतीबा  फुले शिवाजी महाराजांचे वर्णन कुणबीकुलभूषण असे करता. दोघांच्या विचारत समानता दिसत नसली तरी सावित्रीबाई फुले यांचे  शिवाजी महाराजांचे वर्णन  शुद्रादी अतिशुद्रांचा प्रभू हे अधिक समावेशक वाटते आणि यावर संशोधन होणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुले यांनी राणी छत्रपती ताराबाई यांच्यावरही काव्य केलेले आहे.

                   छत्रपती सिहासिनीची एक राणी ताराबाई

                   कोल्हापूरची जगदंबा महिराष्ट्राची अंबाई

                   शत्रूवर घाली छापा काल तयाची ती होई

                   जेरीस शत्रूला करून करी बेफाम चढाई

                   न्हाऊन टाकी रणभूमी

                   शत्रूच्या रक्तानी सारी

                   चपलता विजेची जैसी

                   तशीच कडाडे संहारी ‖‖

आजून कोणती प्रखर स्त्रीवादी विचारची मांडणी करणे बाकी आहे असे वाटते. स्त्रीवादी भूमिकेतून राणी ताराबींचे वर्णन खर्च स्त्रीच्या पराक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवण्याची ताकद सावित्रीबाई यांच्या रचनेतून स्पष्ट दिसत आहे त्याला कोणत्याच स्त्रीवादी विचारांचा मुलामा देण्याची गरज वाटत नाही. प्रश्न उरतो हा आपला स्त्रीवादी भूमिकेचा वारसा आणि त्यातील सौंदर्या आपण कधी विचारात घेतले आहे काय? पुणे विद्यापीठाला नाव देण्यासाठी अनेक वर्षाचा संघर्ष करावा लागावा यासारखे दुर्दैव नाही.

 

सावित्रीबाई फुले यांच्या अनेक रचानातून मग ती ‘जन्मभूमीचे वर्णन’ , ‘मानव व सृष्टी’, ‘तयास मानवा म्ह्नावे का?’ ‘शूद्रांचे दुखणे’ या मधून त्यांच्या विचारातील आधुनिकता अधिक स्पष्टपणे समोर येते. शिकण्यासाठी जागे व्हा या कवितेतून त्यांनी मांडलेली भूमिका खूप महत्वाची आहे. त्या म्हणतात

                   उठा बंधुनो अतिशुद्रानो       जागे होऊनी उठा

                   परंपरेची गुलामगिरी हि       तोडण्यासाठी उठा

                   बंधुनो शिकण्यासाठी उठा  धृ‖‖

              गेले मेले मनु पेशवे         आंग्लाई आली

              बंधि मनुची विद्या घेण्या     होती ती उठवली

              ज्ञानदाते इंग्रज आले         विद्या शिकुनी घ्यारे

              ऐसी संधी आली नव्हती हजार वर्ष रे

              मुलाबाळांना आपण शिकवू    आपण सुद्धा शिकू

              विद्या घेउनी ज्ञान वाढवून    नितीधर्म हि शिकू

              नसा नसातून इर्षा खेळवू     विद्या मी घेईन

              शुद्र्त्वाचा डाग हा माझा निपटून काढीन

              राज्यात बळीच्या       आम्हास विद्या घडो

              यशाची आमच्या            दुदभी नगारे झडो

              ‘इडा पिडा टळो’        या कार्यी भट न पडो

              असे गर्जुनी विद्या शिकण्या   जागे होऊन झटा

              परंपरेच्या बेड्या तोडूनी       शिकण्यासाठी उठा

              बंधुनो शिकण्यासाठी उठा  धृ‖‖

 

खूप मोठा आशावाद मांडला आहे या रचनेत त्याचे प्रतिबिंब राजर्षी शाहू आणि डॉ.बाबासाहेबांच्या मध्ये दिसून येते. या दोघांनी याच विचाराचा वारसा त्यांच्या कृती आणि भूमिकेतून मांडला दिसून येतो.

नसा नसातून इर्षा खेळवू     विद्या मी घेईन

              शुद्र्त्वाचा डाग हा माझा निपटून काढीन हा सावित्रीबाई फुले यांचा आशावाद डॉ.बाबासाहेबांच्या कृतीतून अधिक स्पष्ट पणे कृतीत आलेला दिसत आहे त्यांनी केलेले भाकीत वास्तव स्वरूपात अस्तित्वात आलेले दिसून येते यावरून त्यांच्या वैचारिक वैठ्कीची व्यापती व  त्यांतील दूरदृष्टी अधिक स्पष्ट पणे दिसून येते. शिक्षणाची महती आपल्या काव्य रचना मधून बेधडक पणे मांडताना दिसतात . प्रस्थापित व्यवस्थेचे कसल हि भय नाही विचार करा हीच कविता आता कोणी लिहिली असती तर वेगवेगळी देशभक्तीची सर्टिफिकेट मिळाली असती का? हा परखड पणा सावित्रीबाई फुले यांच्या लिखाण होता.

 

सावित्रीबाई फुले यांच्या ‘ब्रह्मवंती शेती’ या काव्य रचना तर विलक्षण आहे त्यात श्रमप्रतिष्ठा व ज्ञानप्रतिष्ठा एकत्र येण्याची गरज व त्या अंगाने मांडणी केली गेली आहे. ह्या रचनेत त्या मांडणी करताना म्हणतात

                   ब्रम्ह असे शेती  अन्नधान्य देती 

                   अन्नास म्हणती  परब्रम्ह ‖‖‖‖

                   शुद्र करी शेती  म्हणुनी खाती 

                   पक्वान्न झोडती  अहं लोकाशी ‖‖‖‖

                   दारुडे बोलती  तैसे हे वागती 

                   मतलब नीती  वाचालांची ‖‖‖‖

                   जे करती शेती  विद्या संपाद्ती 

                   तया ज्ञानवंती  सुखी करी ‖‖‖‖

 

ह्या रचनेतून सावित्रीबाई फुले यांनी दोन स्तरावर मांडणी केलेली दिसते श्रमप्रतिष्ठा व ज्ञानप्रतिष्ठा. वास्तविक या कवितेतील ३ कवन खूप महत्वाचे आहे

दारुडे बोलती  तैसे हे वागती 

                   मतलब नीती  वाचालांची ‖‖‖‖

 

दारुडे म्हणजे नक्की कोण अपेक्षित आहे याचा विचार केला तर जमीनदारी विरोधातील हे एक अतिशय स्पष्ट विधान केले आहे आणि त्यांच्या शेतावर काम करणारया शूद्राची स्थिती मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे असे माझे व्यक्तीगत मत आहे. भांडवली सरंजाम शाहि जमीनदारांच्या नीतीला त्या मतलबी नीती असे म्हणत असाव्यात असा अर्थान्वय काढता येऊ शकतो. शेतीला व शेतकर्याला श्रमप्रतिष्ठा देण्याचा हा प्रयत्न आजच्या स्थितीत अतिशय समर्पक आहे. शेतीला प्रतिष्ठा देताना त्या आशावादी भूमिकाच मांडताना दिसतात.

 

अंधश्रधा व भोंदूगिरी वर सावित्रीबाई फुले अतिशय विद्रोही मते मांडताना दिसतात. संत साहित्यातील विवेचन आणि मांडणी अतिशय मवाळ भाषेत दिसून येते पण सावित्रीबाई फुले यांची मांडणी अतिशय तीक्ष्ण आणि प्रवाहाच्या विरोधात जाणारी आहे. खऱ्या अर्थाने विद्रोही साहित्यिक कवी म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल ‘नवस’, तेच संत’ या कविता आजच्या समाजालाही तशाच्या तशाच्या लागू पडतात नवस कविते  अंधश्रधा व प्रथा वर प्रहार करताना त्या म्हणतात.

                   गोट्याला शेंदूर  फासुनी तेलात 

                   वसती देवात  दगड तो ‖‖

                   म्हसोबा खेसोबा  भयंकर देव

                   तयावर भाव  ठेवूनिया 

                   नवस करती  बकरु मारीन 

                   नवस फेडीन  बाळ जन्मी 

                   धोंडे मुले देती  नवसा पावती

                   लग्न का करती  नारी नर ‖‖

विज्ञाननिष्ठ वैचारिक मांडी करताना परंपरागत प्रथा आणि अंधश्रध व्यवस्थेला प्रश्नच विचारला गेला आहे पुढे संत गाडगेबाबा हाच विचार त्यांच्या भजनातून मांडताना दिसतात. देवाला दगड म्हण्याचे धाडस अगदी पीएचडी घेतलेला व्यक्ती आज भारतीय लोकशाही व अनेक हक्क असताना मांडू शकत नाही. मग त्या काळात या काव्य रचनेन किती धुरळा उडवला असेल याची कल्पनाच सावित्रीबाई फुले यांच्या निर्भीड पणाला सलाम करते. “तेच संत” हि कविता तर आजच्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालते या रचनेत मांडणी करताना त्या म्हणतात

                   वाचे उच्चारी  तैसी क्रिया करी

                   तीच नरनारी  पूजनीय ‖‖

                   सेवा परमार्थ  पाळी व्रत सार्थ

                   होई कृतार्थ  तेच वंध ‖‖

                   सुख दु;ख काही  स्वार्थपना नाही

                   परहित पाही  तोच थोर 

                   मानवाचे नाते  ओळखती जेते

                   सावित्री वदे  तेच संत ‖‖

     सदर कवितेतील हि तिनी कवने आपल्या आजू बाजूला असलेल्या असलेल्या मंदिर आश्रमातील, डेरयातील विविध धर्मातील स्वघोषित बाबा, महाराज, फादर , मौलानी , यांना आपण लावून पाहिलीत तर आपणास कळेल आपण कोणता विचार स्वीकारतोय आपण कोणाला बली पडतोय.  सावित्रीबाई फुलेयांनी त्याच काळात ओळ्खल होत लोक अशा भोंदूगिरीला बली पडत आहेत आणि भविष्यात बली पडतील म्हणून एक वैचारिक तत्वज्ञान आपल्या समोर मांडले होत पण वास्तवात ते आपण स्वीकार करतो का? ते आपण स्वीकारळ पाहिजे ती खरी आजच्या दिवसाची फलश्रुती ठरेल.

 

 

सावित्रीबाई फुलेयांच्या काव्याच्या केंद्र स्थानी मानव व मानवता असणे हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट म्हणावे लागेल. मानव ज्ञानमय झाला पाहिजे , तो कर्मयोगी झाला पाहिजे, तो मानवतावादी असला पाहिजे असा आशावादि भूमिका त्यांच्या अनेक कवितातून दिसून येते. “त्यास मानव म्हणावे काय?” हे त्यातील एक महत्वाचे उदाहरण म्हणावे लागले. या रचनेत त्या मांडणी करताना म्हणतात

                   ज्ञान नाही विद्या नाही

                   ते घेनेची गोडी नाही

                   बुद्धी असुनी चालत नाही

                   तयास मानव म्हणावे काय? ‖‖‖‖

                   देरे हरी पलंगी काही

                   पशुही ऐसे बोलत नाही

                   विचार ना आचार ना

                   तयास मानव म्हणावे काय? ‖‖‖‖

 

 

सावित्रीबाई फुलेयांच्या लिखाणातील सौंदर्यशास्त्राचा विचार केलाच तर माझ्या मते स्व-टीका व आशावाद हि दोन महत्वाचे घटक म्हणावे लागतील. प्रत्येक कवितेत प्रश्नाचे मुल आणि त्याचे उत्तर अगदी आशावादी भूमिकेतून मांडताना त्या दिसतात. प्रश्नाचे स्व विवेचन आणि त्याची प्रखर आणि स्पष्ट मांडणी हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट म्हणावे लागेल. त्यांच्या काव्यातून स्वतंत्र विचाराची मांडणी होताना दिसते . त्यांच्या विविध कविता मधून शूद्रांच्या प्रश्नांवर विवेचन केले आहे “शुद्र शब्दाचा अर्थ” , शूद्रांचे परावलंबन” या कवितेतून त्यांनी केलेली मांडणी खूप समर्पक आहे त्या म्हणतात

              शुद्र आणि अतिशूद्र  अज्ञानाने पछाडले

              देवधर्म रूढी अर्ची  दारिद्याने गळाले

              सुखाची नसते हाव  दु;खास सुख मानती

              विधाते निर्मिले तैसे  रहावे बोध सांगती

              वैरागी भट मागोती  फिरती काम सोडुनिया

              करा निफल चाकरी  स्वर्गीय पुण्य चिंतुनीया

              ज्ञानाचे नसती डोळे  म्ह्णोनी न दिसे दुख

              स्वावलंबी नसे शुद्र  स्विकारती पशु सुख

ह्या रचनेतील सौंदर्याशास्त्राचा विचार केला तर  त्यांनी दिलेल्या ज्ञानडोळेची उपमाच खूप तत्वज्ञान सांगनारी आहे आणि द्यान नसल्या मुले कुश काय आणि दु;ख काय याचा फरक शुद्र आणि अतिशुद्राना करता येत नाही. शुद्र आणि अतिशूद्र देवाच्या रुढीच्या मध्ये अडकतात आणि दारिद्यात गळतात.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांनी त्यांच्या मांडणीत हीच भूमिका मांडलेली आहे. डॉ. बाबासाहेबांचे जाती अंताच्या संदर्भातील प्रसिद्ध भाषणत हीच माडणी बाबासाहेब करताना दिसतात. धर्मशास्त्रे सोडली पाहिजेत तरच जाती अंत शक्य आहे. शाहू महाराज आपल्या अनेक भाषणात हीच भूमिका मांडताना दिसतात .

 

म.फुले एका बाजूला शेतकऱ्यांचा आसूड मधून शेतकरी यांच्या समस्यांवर मांडणी करताना दिसतात . तर दुसरीकडे  सावित्रीबाई फुलेयांच्या कवितांमध्ये तीच भूमिका प्रतिबिंबित होताना दिसते. सावित्रीबाईयांनी ५२ कडव्याचे अथ “बावन्नकशी सुबोध रत्नाकर” नावाचा काव्यग्रंथ लिहिला आहे. हे काव्यखंड नसून जोतीबा आणि त्यांचे विचार याबाबतीतील समीक्षा काव्य आहे. अशा प्रकारच्या काव्य रचना व साहित्याचा दुसरा कोणताही नमुना आजच्या मितीला मराठी साहित्यात आढळत नाही. सिद्धता , पेशवाई , अंग्लाई , जोतीबा, उपसंहार या मध्ये ५२ कडवी विभागली आहेत. ह्या ५२ खंडातील सौंदर्यशास्त्रावर आणि त्यातील मांडणीवर अनेक तास बोलावे लागेल. आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने जर आपणास साजरा करावयाचा असेल तर  सावित्रीबाईयांनी जो आशावाद आणि विचार मांडला आहे तो जरी आपण स्वत:पुरता किंवा अंगीकार करण्यास स्वत: पासून सुरुवात केलीतरी अनेक प्रश्न आपोआप सूट जातील. हा आशावाद सुद्धा त्यांच्याच लेखनातून आणि साहित्यातून आपनास मिळतो. हे मात्र नक्की.

 

Comments

Popular posts from this blog